चांदीमुळं चकाकलं 'या' गावाचं नशीब, काळ बदलला, पण आजही टिकून आहे दागिन्यांची आगळीवेगळी परंपरा

या गावातल्या चांदीच्या दागिन्यांना आणि गावाला जी. आय. मानांकन मिळालं आहे.
फोटो कॅप्शन, या गावातल्या चांदीच्या दागिन्यांना आणि गावाला जी. आय. मानांकन मिळालं आहे.
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

कोल्हापूरपासून साधारण 25 किलोमीटरवर असलेल्या हुपरी परिसरात चक्कर टाकली की हातात ताट घेऊन बसलेल्या गप्पांमध्ये रमलेल्या बायका दिसतात.

दारात, अंगणात बसून त्यांची चर्चा सुरू असते आणि सोबत हातात ताटं घेऊन कामही. वरवर पाहिलं, तर वाटावं की त्या धान्य निवडत बसल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या ताटामध्ये धान्य नाही, तर चांदी असते.

चांदीचं गाव किंवा रजत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीतलं हे दृश्य. आज या गावातल्या घराघरात चांदीशी निगडित काम करणारे कारागीर आहेत.

आज हे रुप दिसत असलं, तरी या गावाला चांदीची नगरी म्हणून ओळख मिळण्यामागे मोठा इतिहास आहे.

हुपरीचा इतिहास

इथल्या चांदी कारखानदार असोसिएशनने नोंदवलेल्या इतिहासानुसार, इसवी सन 1300 पासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. तेव्हाचे देवगीरीचे राजे श्री रामचंद्रराव यादव काळात कर्नाटकातील विजापूरहून महाराष्ट्राच्या कोकणात व्यापारासाठी जायचे. तेव्हा प्रवासासाठी विसावा म्हणून हुपरीत त्यांचा मुक्काम असायचा.

त्या काळात इथले कारागीर हत्ती-घोडे यांना घालण्यासाठी दागिने तयार करत असत. त्यानंतर इसवी सन 1800 मध्ये निपाणीकर देसाई यांनी हल्ला करुन हुपरी गाव किल्ल्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपतींनी हे गाव काबीज केलं आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थान काळापासून इथे बदल होत गेले.

हुपरी नगरपालिका फलक

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, या गावाला चांदीची नगरी म्हणून ओळख मिळण्यामागे मोठा इतिहास आहे.

इथला इतिहास सांगताना चांदीचे व्यापारी सतीश भोजे म्हणाले,"छत्रपती शाहू महाराज फिरण्यासाठी आणि शिकारीसाठी हुपरीत यायचे. ते तिथे असताना त्यांच्या घोड्याचा दागिना खराब झाला. त्यावेळी हुपरीत स्थायिक असलेल्या कृष्णाजी पोतदारांनी त्याची दुरुस्ती करुन दिली. तिथून व्यवसाय म्हणून याकडे पहायला सुरुवात झाली."

"गावातील प्रत्येक जण या व्यवसायाकडे वळला. शाहू महाराजांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं म्हणा की. त्यामुळे हुपरीचा कायापालट झाला," असं सतीश भोजे सांगतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

गाव ते पंचक्रोशी प्रवास

हुपरीतले लोक दागिने घडवायला लागले. त्यात अर्थातच आवश्यकता होती ती कारागीरांची. मग व्यापाऱ्यांच्या, कारागीरांच्या हाताखाली काम करत आधी कारागीर आणि मग व्यापारी असा प्रवास सुरू झाला.

हुपरीचे दागिने हस्तकलेसाठी प्रसिद्ध. त्यामुळे इथे एकाच प्रकारचं काम पिढ्यानपिढ्या करणारी कुटुंबं आहेत. यातूनच आजचा कारागीर उद्याचा व्यावसायिक या धोरणातून हे गाव घडत गेलं आणि चांदीचा व्यवसाय बहरत गेला.

चांदी घडवण्याच्या प्रक्रियेत चांदीची आटणी काढणे, चांदीची टक्केवारी म्हणजे टंच तपासणे, मशिन प्रेस, डिझाईन, कटिंग, डायमेकर, सूत पास्टा बनविणे, साखळी जोडकाम करणे असे टप्पे आहेत.

इथल्या चांदी कारखानदार असोसिएशनने नोंदवलेल्या इतिहासानुसार, इसवी सन 1300 पासून या प्रक्रियेला सुरुवात झाली.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, इथल्या चांदी कारखानदार असोसिएशनने नोंदवलेल्या इतिहासानुसार, इसवी सन 1300 पासून या प्रक्रियेला सुरुवात झाली.

गावातले जुने व्यावसायिक यातलं एकाच प्रकारचं काम करतात. त्यामुळे गावात चांदीची टक्केवारी काढणारी वेगळी दुकानं, डायमेकरची वेगळी दुकानं असं रुप पहायला मिळायचं.

यातूनच या गावासोबतच पंचक्रोशी म्हणजे पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगे, यळगूड, रेंदाळ, रणदेवीवाडी, सांगाव, कागल, इचलकरंजी यासोबत कर्नाटक सीमेलगत मांगूर, बारवाड, कुन्नूर, ढोणेवाडी, कारदगा अशा अनेक गावांमध्ये चांदी हस्तकला उद्योग पोहोचला आहे.

आज या गावातल्या घराघरात चांदीशी निगडित काम करणारे कारागीर आहेत.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, आज या गावातल्या घराघरात चांदीशी निगडित काम करणारे कारागीर आहेत.

तंत्रज्ञानाने प्रगती केली तशी हस्तकला मागे पडत त्याची जागा मशीनने घेतली. पण गावात अजूनही अनेक घरांमधून, दुकानांमधून ही कामं चालतात.

सध्या या सगळ्या परिसरात एकूण चांदी हस्तकला उद्योजकांची संख्या आहे अंदाजे 10 हजार आणि हस्तकला कारागिरांची संख्या आहे अंदाजे 35 हजार.

घराघरात चालणारं काम आणि महिलांचा सहभाग

उद्योगाची वाढ होत गेली तशी कुशल आणि अकुशल कारागिरांची गरजही वाढली. यातूनच व्यापाऱ्यांकडून आलेल्या चांदीची जोडणी करुन देण्यासाठी महिलांचा सहभाग दिसायला लागला. यासाठी पण एक व्यवस्था निर्माण झाली आहे.

व्यापारी जे काम असेल ते आणि त्यासाठीची चांदी महिलांकडे पोहोचवतात. मग वेळ मिळेल तसं ते काम करुन महिला ते पुन्हा व्यापाऱ्यांकडे देतात.

व्यापाऱ्यांकडून आलेल्या चांदीची जोडणी करुन देण्याच्या या कामाला इथं 'भरणी' म्हणून ओळखलं जातं. हुपरी आणि परिसरातल्या घराघरातून बायका हे काम करतात. दररोजच्या तीन-चार तासांचे साधारण महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये या महिलांच्या हाती पडतात.

चांदीचं गाव किंवा रजत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीतलं हे घरोघरीचं दृश्य.

फोटो स्रोत, nitin nagarkar

फोटो कॅप्शन, चांदीचं गाव किंवा रजत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीतलं हे घरोघरीचं दृश्य.

या कामाविषयी बोलताना हुपरीच्या रहिवासी मनिषा घोरपडे म्हणाल्या, " घरातलं काम आवरून चार तास, पाच तास जसा वेळ मिळेल तसं आम्ही हे काम करतो. रॉ मटेरियलपासून पैंजण-जोडवी असे वेगवेगळे डिझाईन, प्रकार आम्ही तयार करतो. कच्च्या मालाचे प्रोडक्ट तयार करुन आम्हा बायकांना भरणी भरायला देतात."

तर काही घरांमध्ये मात्र संपूर्ण सेट अप त्याच घरात बसवला गेला आहे. व्यापाऱ्यांचे संपूर्ण काम तिथूनच चालते. यासाठी कुशल कारागीर असणारे महिला पुरुष त्यांच्या घरी जाऊन हे काम करतात.

आजचा कारागीर उद्याचा व्यावसायिक या धोरणातून हे गाव आणि चांदीचा व्यवसाय घडत गेला.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, आजचा कारागीर उद्याचा व्यावसायिक या धोरणातून हे गाव आणि चांदीचा व्यवसाय घडत गेला.

सुदर्शन फिरगाण यांच्या घरात वडीपासून चांदी वितळवणे ते दागिना घडण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया होते. यासाठी आधी चांदी वितळवली जाते, मग त्याच्या पट्ट्या किंवा सळई तयार केली जाते. याला इथं 'पास्टा' असं म्हणतात.

पुढचा टप्पा असतो तो चांदीचा दागिना घडवण्याचा. त्यासाठी जो छाप उमटवायचा आहे तो त्या सळई किंवा पट्टीवर उमटवून त्याचे तुकडे केले जातात. दुसरीकडे केमिकलचा वापर करत घुंगरांचीही निर्मिती केली जाते.

त्याला जोडलेल्या साखळ्या तयार करुन मग त्याला झळाळी दिली जाते आणि तऱ्हे तऱ्हेचे पैंजण तयार होतात. फिरगाण यांच्या गेल्या तीन पिढ्या चांदीचाच व्यवसाय करत आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना सुदर्शन फिरगाण म्हणाले, "साधारणतः आमच्या घरात या व्यवसायाशी संबंधित 50 वर्ष झाले. आमचे आजोबा होते. वडिल परंपरेने व्यवसाय शिकल्यानंतर चुलत्याकडे वगैरे मी 1996 पासून या व्यवसाय आहे."

"या हुपरी गावामध्ये सर्वच कामं इथं होऊ शकत नाहीत. कारण मजुरांचा तुटवडा पडतो. काही काम स्त्रियांमार्फत करून घेतले जाते. आम्ही ते काम घराघरात नेवून देतो आणि आठवड्याभरानं घेऊन येतो.

हस्तकलेचे दागिने

काही व्यापारी आता मशीनचा वापर करत असले, तरी या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हस्तकलेने घडणारे चांदीचे दागिने. यात मात्र दागिना तयार होण्यासाठी विविध ठिकाणी जातो.

टंच मोजण्यापासून (टक्केवारी निश्चित करणे) ते दागिना जोडण्यापर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे लोक आहेत.

प्रत्येकाचं त्या कामात नैपुण्य. पिढ्यानपिढ्या लोक तेच काम करतात. या पद्धतीत एक दागिना घडण्यासाठी कमीत कमी 19 ठिकाणी फिरतो.

इथल्या रुपाली, सोन्या आणि गजश्री या प्रकारातले पैंजण प्रसिद्ध आहेत.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, इथल्या रुपाली, सोन्या आणि गजश्री या प्रकारातले पैंजण प्रसिद्ध आहेत.

गावात आता पैंजण, जोडवी, करदोडे, बिंदली, मासोळ्या, बाजूपट्टा, ब्रेसलेट, भांडी यापासून ते अगदी घागरी, शोपीस, कळस इतकंच काय तर चांदीचे नक्षीकाम केलेले सुबक दरवाजेही घडवायला सुरुवात केली. पण पैंजण हे त्याचं वैशिष्ट्य मात्र कायम आहेत.

इथल्या रुपाली, सोन्या आणि गजश्री या प्रकारातले पैंजण प्रसिद्ध आहेत. याशिवाय आता काळाप्रमाणे मँगो पायल वगैरे नव नवीन प्रकारचे पैंजणही गावात घडवले जातात.

अर्थात सगळ्याच व्यापाऱ्यांनी काही पैंजणाचा व्यवसाय केला नाही. अशोक सुतार यांच्या दुकानात सहज नजर टाकली तरी अचंबीत व्हावं अशा प्रकारच्या वस्तु नजरेस पडतात. त्यांच्याकडे चांदीच्या घड्यापासून ते चांदीच्या चप्पलेपर्यंत अनेक वस्तू घडवल्या गेल्या आहेत. त्यांच्या आजोबांनी या व्यवसायाची सुरुवात केली.

पूर्वी घडवलेला चांदीचा सिगारेट बॉक्स ते अलिकडे घडवलेले चांदीचे दरवाजे अशा अनेक वस्तू ते दाखवतात.

अजूनही बार्टर सिस्टीमचा वापर

व्यापारासाठी मात्र इथे वस्तू विनिमय प्रणाली म्हणजे बार्टर सिस्टीम वापरली जाते. म्हणजे चांदीच्या बदल्यात चांदी आणि केलेल्या कामाचे कारागिरीचे पैसे असं इथल्या व्यवहाराचं स्वरूप आहे.

याविषयी बोलताना सुदर्शन फिरगाण म्हणाले," बाकीचे व्यवसाय हे पैशांच्या विनिमया मध्ये होत असतात. पण चांदीचं कसं आहे स्त्रिया पैंजण वापरतात आणि खराब झाला की सराफाकडे घेऊन येतात. ती मोड आम्ही घेतो आणि आमचा माल देतो.

चांदी आणि मजुरी या स्वरुपातच व्यवसाय चालतो आमचा. भंगार गोळा होतो ना लोखंड वगैरेचा तसा चांदीचा पण होतो. त्यावर व्यवसाय चालतो आपला."

व्यापारासाठी मात्र इथे वस्तू विनिमय प्रणाली म्हणजे बार्टर सिस्टीम वापरली जाते.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, व्यापारासाठी मात्र इथे वस्तू विनिमय प्रणाली म्हणजे बार्टर सिस्टीम वापरली जाते.

या गावातल्या चांदीच्या दागिन्यांना आणि गावाला जी.आय मानांकन मिळालं आहे. प्राण्यांच्या दागिन्यांपासून सुरु झालेला व्यवसाय आता ॲन्टिक दागिन्यांपर्यंत पोहोचला आहे. हे दागिने भारतासह युरोप, मध्य पुर्व आशिया आणि अमेरिकेत पाठवले जात आहेत.

हुपरीतल्या चांदी कारखानदार असोसिएशनचे पदाधिकारी राजेश वायंगडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, " आमच्याकडे 34 दागिन्यांना जीआय मानांकन मिळालं आहे. 100 प्रकारचे पैंजणच इथे घडतात.

हुपरीचे दागिने हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, हुपरीचे दागिने हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत.

या गावांमधून 100 कोटींचा फक्त टॅक्सच भरला जातो. त्या तुलनेत सुविधा मात्र कमी आहेत. पाण्यापासून इतर अनेक प्रश्न भेडसावत आहेत. आता एमआयडीसी झाल्यापासून हे काम सोडून इतर कामं करण्याकडे देखील तरुण वळत आहेत.

सरकारने आता इथं एक सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे. तिथं एकत्रितरित्या आधुनिक पद्धतीने काम व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत"

तंत्रज्ञानाचा प्रगतीच्या काळात हस्तकला मागे पडत चालली आहे. अशामध्ये गरजेप्रमाणे बदलत कला टिकवण्यासाठी हे चांदीचं गाव धडपडतंय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.