मासिक पाळीदरम्यान या गावातील महिलांना पाठवलं जातं जंगलात, गावातून अन्न-पाणीही जात नाही

- Author, तुलसी प्रसाद रेड्डी नागा
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
- Published
मासिक पाळीदरम्यान अनेक ठिकाणी महिलांना विधी किंवा पूजाच नव्हे तर घरातील दैनंदिन कामापासूनही दूर ठेवलं जातं.
अगदी आजही आपल्याला अशा गोष्टी ऐकायला-पाहायला मिळतात. पण आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवरील काही गावं तर आणखी एक पाऊल पुढं आहेत. याठिकाणी महिलांना त्यांच्या मासिक पाळीदरम्यान थेट गावाबाहेर जंगलात पाठवलं जातं.
बीबीसीनं काही वर्षांपूर्वी (2018 मध्ये) सामाजिक मुद्द्यांवर आधारित वृत्तकथांची मालिका केली होती. त्या निमित्तानं आम्ही त्यावेळी आंध्रप्रदेशच्या अनंतपुरम जिल्ह्यातील रोल्ला मंडलमधील गंता गोलहाट्टी नावाच्या गावाला भेट दिली होती. याठिकाणी अशाच प्रकारच्या रुढींचं आजही पालन केलं जातं.
बीबीसीनं या गावातील रुढीचंही वृत्तांकन केलं होतं. अशा प्रकारच्या रुढींच्या विरोधात जनजागृती पसरवण्यासाठी नेमकं काय केलं जातं, याबाबतही बीबीसीनं अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती.
त्यावेळी अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये बदल घडवून आणत असल्याचा दावा केला होता. पण अजूनही अशा गावांमधली परिस्थिती फारशी बदलेली नसल्याचं वास्तव, प्रतिमा यांनी बीबीसी साठीच्या रिपोर्टमध्ये मांडलंय.
फक्त याच गावात नव्हे तर, आंध्रप्रदेशच्या कुप्पम मंडळातील उरीनयनपल्ली, उरीनयनी कोथ्थुरू, सल्लारपल्ली तसंच गुडीपल्ली मंडळातील पालयम आणि तमिळनाडूच्या एकलंथम गावातही अशाच प्रकारच्या प्रथा पाहायला मिळतात.
या गावांच्या लोकसंख्या अंदाजे 2500 च्या आसपास आहेत. या गावांमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना गावापासून दूर ठेवण्याची प्रथा आहे. बीबीसीनं या गावांना भेट दिली. त्याठिकाणी या प्रथेचा सामना करावा लागत असलेल्या म्हणजे मासिक पाळीदरम्यान बाहेर राहावं लागणाऱ्या महिलांशीच आम्ही बोललो.
उरीनयनपल्ली, उरीनयनी कोथ्थुरू आणि सल्लारपल्ली ही गावं आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम या मंडळ मुख्यालयापासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर आहेत. या गावांपासून काही किलोमीटर अंतरावर गुडीपल्ली मंडळातील पालयम गाव आहे.
तर उरीनयनपल्लीपासून जंगलामधून 6 किलोमीटर चालत गेल्यानंतर तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील एकलंथम गावात पोहोचता येतं. या गावांमधील बहुसंख्य लोकसंख्या ही वाल्मिकी नायडू जातीची आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना गावाबाहेर पाठवण्याची प्रथा ते अगदी पूर्वीपासूनच पाळत आहेत.

रस्त्यामार्गे एकलंथमला जायचं असेल तर, कुप्पम-कृष्णगिरी मार्गावर 30 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर महाराजा कडाईजवळच्या सकानावुरूमार्गे डोंगराच्या माथ्यापर्यंत पोहोचावं लागतं.
इथं आहे एकलंथम गाव. आंध्रप्रदेशातील कुप्पमपासून ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील 200 घरांमध्ये जवळपास 900 रहिवासी राहतात.
जंगलात राहून दगडांवर अन्न ठेचायचं
विकासाशी दूरपर्यंत संबंध नसलेल्या या गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी हँडपंपचा वापर करतात. गावात महिलांसाठी निवारा बांधलेला असला तरी, महिला केवळ रात्रीच्या वेळीच याठिकाणी राहू शकतात.
सकाळीच त्यांना गावापासून दूर असलेल्या टेकडीवर निघून जावं लागतं. त्याठिकाणी असलेल्या पाणवठ्यांच्या आजूबाजुला त्या राहतात. तिथंच त्या खाण्यासाठी अन्न शिजवतात. त्यांना लोणचं किंवा भाजी बनवण्यासाठी भाजीपाला दगडांवर ठेचून बारीक करावा लागतो.
मासिक पाळी येत असलेल्या या गावातील प्रत्येक महिलेला दर महिन्याला 4 दिवस गावाबाहेर राहावं लागतं. मग रखरखतं उन्हं असो किंवा मग मुसळधार पाऊस असो, त्यांना गावाबाहेरच राहावं लागतं.
अनेक युगांपासून ही परंपरा चालत आली असल्याचं, मल्लिका यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं. मल्लिका यांचं माहेर तमिळनाडूच्या एकलंथमचं असून त्यांचा विवाह आंध्र प्रदेशच्या उरीनयनपल्ली गावातील कुटुंबात झालेला आहे. त्यांच्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडं ही परंपरा मात्र सारखीच आहे.

"मासिक पाळीदरम्यान महिला गावात प्रवेश करू शकत नाही. ही प्रथा आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. आम्हाला घरात राहण्याची परवानगी दिली जात नाही. 4 दिवस या टेकडीवर राहावं लागतं. त्यानंतरच परत जाऊ शकतो. या टेकडीवर आम्ही एका झाडाखाली राहतो. जोरदार पाऊस आला तर, मोठी दगडं किंवा झाडाच्या सहाय्यानं ताडपत्री लावून त्याखाली राहतो. आम्ही मोठ-मोठ्या दगडांखाली आसरा घेतो. कारण जर दुसरीकडं कुठं गेलं तर सगळीकडंच साप किंवा विंचवांचा धोका असतो. त्या दिवसांत आम्ही आमच्या सुरक्षेची जबाबदारी देवावर सोपवतो. आम्ही दुसरं करणार तरी काय? त्या 4 दिवसांत आम्हाला ज्या अडचणी किंवा धोक्यांचा सामना करावा लागतो, त्याबरोबरच जीवन जगावं लागणार आहे," असं मल्लिका म्हणाल्या.
पण फक्त मासिक पाळी आलेल्या महिलाच नव्हे, तर त्यांची चिमुकली मुलंदेखील त्यांच्याबरोबर जंगलामध्येच राहतात. या मुलांना ते राहतील तिथं म्हणजेच जंगलात कुटुंबाकडून अन्न पुरवलं जातं.

"मला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांना अंघोळ केल्यानंतरच गावातील घरांमध्ये प्रवेश दिला जातो. नसता त्यांनाही गावात जाता येत नाही आणि आमच्यासोबतच राहावे लागते.
"मुले घरात परत येईपर्यंत त्यांना खाण्यासाठी काही असो की नसो पण त्यांना नाश्ता दिला जातो. जर तेही उपलब्ध नसेल तर आम्ही तळ्याजवळ जाऊन स्वयंपाक करतो आणि खातो. पूर्वीपासून ही प्रथा अशीच आहे. अगदी तीन महिन्यांचं लहान बाळ असलं तरी, त्याला आम्हाला घरापासून दूर म्हणजे आमच्याबरोबर ठेवावं लागतं," असंही मल्लिका म्हणाल्या.
वयात येणाऱ्या मुलींनाही पाठवतात गावाबाहेर
सल्लारपल्लीमधील महिलांची स्थितीही अगदी तशीच आहे. पण फक्त मासिक पाळी येणाऱ्या महिलांनाच 4 दिवस गावाबाहेर राहावं लागतं असं नाही.
तर गावातील ज्या मुली वयात येणार असतील त्यांनाही सण-उत्सवांच्या काळात गावात राहू दिलं जात नाही. मुलगी जेव्हा वयात येणार असते, तेव्हा तर तिला 10 दिवसांसाठी गावाबाहेर राहावं लागतं, असं स्थानिक सांगतात.
सकाळी किंवा दिवसा त्या शेताच्या परिसरात राहू शकतात, मात्र, रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी देवावरच विश्वास ठेवावा लागतो, असं सल्लारपल्लीमधील बालम्मा यांनी म्हटलंय.

"पूर्वीच्या काळी महिला मोठ्या आकारांच्या दगडाखाली खड्डे करून त्यात राहत असायच्या. पण आता रुग्णालयं उपलब्ध असल्यानं त्या प्रसुतीसाठी तिथं जातात. त्या हॉस्पिटलमध्ये पाच दिवस राहतात. त्यानंतरही त्यांना अंघोळ केल्यानंतरच गावात प्रवेश मिळतो. मुलगी तारुण्यात आली असेल, तर तिला 10 दिवसांसाठी गावाबाहेर राहावं लागतं. 11 व्या दिवशी, पुजारी तिला घरी घेऊन येतात. त्यानंतर काही विधी करून नंतर त्या मुलीला घरी सोडलं जातं. मासिक पाळीदरम्यान आम्ही शेतात किंवा डोंगरांवर राहतो. देवानं आमचं नशीबच तसं लिहिलंय. आता काही करू शकत नाही. अनेक युगांपासूनची ही प्रथा आहे. कुटुंबातील मुलगी असो किंवा सून, मासिक पाळीदरम्यान महिलेला गावाबाहेरच पाठवलं जातं," असं त्या म्हणाल्या.
बरं, फक्त गावातील महिलाच नव्हे. गावात बाहेरून येणारी महिलाही मासिक पाळी येणारी असेल, तर तिलाही सल्लारपल्लीमध्ये 5 दिवस गावापासून दूर ठेवलं जातं.
'बाहेरच्या लोकांना आमच्या वेदना कळणार नाहीत'
एकलंथम गावातील मासिक पाळी आलेल्या काही महिला गावाबाहेर जंगलात राहतात, हे समजल्यानंतर आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो. काही महिला स्वयंपाक करत असल्याचं आम्हाला दिसलं. आम्ही त्यांना, इथं का राहतात असं विचारलं.
"गावामध्ये ही एक प्रथा सोडली तर सर्वकाही अगदी चांगलं आहे. बाहेरच्या लोकांना कदाचित याबाबत माहिती नाही. अगदी मुलांनाही, याबाबत काहीही माहिती नाही. मला मात्र या सर्वाचा राग येतो. माझ्या मूळ गावी तंजावरमध्ये अशी प्रथा नाही. आमच्या गावात मासिक पाळीदरम्यान महिला, देवघरात प्रवेश करत नाहीत. पण मासिक पाळीदरम्यान घरात राहू शकतो. माझं लग्न होऊन जेव्हा मी या गावात आले, त्यानंतर मला या प्रथेबद्दल समजलं. माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. मला लग्नाच्या आधी याबाबत काहीही माहिती नव्हतं. मासिक पाळीदरम्यान मला गावाबाहेर राहावं लागेल, हे मला नंतरच समजलं," असं कसिमा यांनी म्हटलं.

"मी माहेरच्या कोणालाही याबाबत सांगितलेलं नाही. कारण मला वाटतं, ते गैरसमज करून घेतील. आता मी इथं आहे तर मला अॅडजस्ट करावंच लागेल. मी गावी गेले की कुणालाही याबाबत सांगत नाही, पण मला ही प्रथा आवडत नाही. पण या गावातील लोक म्हणतात, ही जुनी परंपरा आहे. त्यामुळं मला ही प्रथा आवडत नसली, तरी मी काय करणार? ही प्रथा अगदीत वाईट आहे. हे पूर्वीच्या काळी घडलं आहे. पण अजूनही तेच, आपण असं राहू शकत नाही. माझ्या, मुलींनाही हाच त्रास सहन करावा लागेल? हे बदलायलाच हवं, " असंही कसिमा म्हणाल्या.
सामाजिक कार्यकर्ते कितपत यशस्वी?
समाजात अगदी खोलवर रुतलेल्या अशा प्रथा बदलण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात. गेल्या 7 वर्षांमध्ये त्यांना कदाचित काही यशही आलं असेल. पण अजूनही बरंच काही बदलायचं आहे, असं मत कुप्पम प्रजा वेदिका संस्थेतील सामाजिक कार्यकर्ते मुनिराजू बाबू यांनी बीबीसीबरोबर बोलताना व्यक्त केलं.
"आम्ही यासाठी 2016 पासून काम करत आहोत. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील तीन गावांमध्ये आणि तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील एका गावामध्ये अशा प्रकारची अंधश्रद्धा आहे. या गावातील महिलांना मासिक पाळीदरम्यान गावाबाहेर ठेवलं जातं, असं आम्हाला समजलं. तेव्हापासूनच आम्ही गावात वारंवार भेटी देत आहोत. डॉक्टर आणि द्रविडीयन विद्यापीठातील सामाजिक कार्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही गावातील ज्येष्ठांच्या भेटी घडवतो, जनजागृती करतो, त्यांना गावामध्ये आवश्यक त्या सुविधा पुरवतो. या प्रयत्नांतून काही बदल घडले आहेत, पण त्यात वाढ होणं गरजेचं आहे. अजून खूप काही मिळवायचं शिल्लक आहे," असं मुनिराजू म्हणाले.

गावकऱ्यांशी मिळून मिसळून त्यांच्यात एकरूप होऊन काम केलं तरच यात यश मिळू शकेल, असं मुनिराजू यांचं मत आहे. त्यामागची कारणंही त्यांनी सांगितली.
"गेल्या 4 दशकांमद्ये अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय नेत्यांनी यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण ही प्रथा फक्त फक्त इथंच का आहे, इतर कुठेही का नाही हे त्यांना माहिती आहे. पण तरीही त्यांना यश मिळालं नाही. जर आपण गावकऱ्यांशी मिळून मिसळून प्रयत्न केले तरच गावातील ज्येष्ठ किंवा महिलांमध्ये अपेक्षित असलेला बदल घडवून आणता येऊ शकतो. गावातील ज्येष्ठ महिलांना असं सांगतात की, गावातील देवाचे दागिने गावात असल्यानं, मासिक पाळीदरम्यान त्यांना म्हणजे महिलांना गावाबाहेर राहावं लागेल. महिलाही देवाला मानत असल्यानं, त्यांनाही मासिक पाळीदरम्यान गावात राहणं योग्य नाही, असंच वाटतं. पण तरीही परिस्थिती बदलण्यासाठीचे आमचे प्रयत्न भविष्यात सातत्याने सुरुच राहतील," असंही ते म्हणाले.

गावातील लोकांच्या भावनांचा आदर करून आम्ही दात्यांच्या मदतीनं, गावाबाहेर महिलांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून पक्क्या इमारती बांधल्या आहेत, असंही मुनिराजू म्हणाले.
पूर्वीच्या काळी मुट्टू गुडीसे (गवताचं छत असलेलं पण जिथे कोणीही जात नाही ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाबाहेरील घराला आम्ही महिलांसाठी निवाऱ्याचं रुप दिलंय. बदलाच्या दिशेनं हे पहिलं पाऊल असल्याचं आम्ही मानतो, असं त्यांनी म्हटलं.
"इंग्रजी माध्यमांमध्ये जेव्हा या प्रथेबाबत बातमी आली, तेव्हा विजयवाडा येथील कुरुंगती रवीशंकर नावाच्या व्यक्तीनं आमच्याशी संपर्क साधला. ते अमेरिकेत राहतात. ते कुप्पमला आले आणि या इमारती बांधण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. आंध्र प्रदेशच्या उरीनयनपल्ली आणि तमिळनाडूच्या एकलंथममध्ये निवारे बांधण्यासाठी त्यांनी मदत केली. महिलांना जंगलात राहावं लागू नये, त्या सुरक्षित राहाव्या आणि त्या पाच दिवसांत रक्तस्त्राव होत असल्यानं महिला आजारी पडू नये, म्हणून आम्ही हे निवारे उभारले. मुट्टू गुडीसे हे आता महिलांचा निवारा बनलंय. आमच्या मते बदलाच्या दिशेनं हे पहिलं पाऊल आहे," असं ते म्हणाले.
प्रथेची सुरुवात
या गावातील रहिवासी शेतकरी आहेत. उदरनिर्वाहासाठी ते गायी आणि बकऱ्यांवर अवलंबून आहेत. या गावातील रहिवासी अजूनही सँडल किंवा चप्पल वापरत नाहीत. पण आता तरुणांमध्ये काही बदल दिसत आहेत. कारण गावाबाहेर कामासाठी जाणारे तरुण चप्पल वापरतात.
गावातील उत्सवादरम्यान देवाच्या दागिन्यांना स्पर्श करताना कोणीही चप्पल वापरत नाही. तसं करणं अशुभ असल्याचं ते मानतात. ही पाचही गावं जंगलांमध्ये आहेत. त्यांची काही मंदिरंही जंगलामध्ये आहेत. गावातील उत्सव वगळता, त्यांच्या देवतांचे दागिने आणि इतर साहित्य पुजाऱ्यांनी तयार केलेल्या विशिष्ट खोल्यांमध्ये ठेवून दिलं जातं. त्यामुळं कोणीही त्या खोल्यांना स्पर्श करू नये असं मानलं जातं.
"आम्ही कादिरी लक्ष्मी नरसिंहा स्वामींचे पुजारी आहोत. स्वामींची आमच्या गावातूल चालत जात स्वतःच डोंगरावर स्वतःची स्थापना केली होती. आमच्या देवाला स्पर्श करता कामा नये. एकदा उत्सवादरम्यान गावात मासिक पाळी असलेली महिला होती, त्यामुळं परंपरागत वाजवला जाणारा ढोल फुटला होता, अशी अख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून गावातील ज्येष्ठांनी मासिक पाळीदरम्यान महिला गावाबाहेर राहण्याची परंपरा सुरू केली. आमच्या देवाचे दागिने या गावांमध्ये पसरलेले आहेत. त्यामुळं या पाचही गावांमध्ये ही प्रथा आहे. या प्रथा युगानुयुगे चालत आलेल्या आहेत," असं उरीनयनपल्लीमधील रहिवासी तय्यप्पा यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

मासिक पाळीदरम्यान त्या महिलांना गावातून अन्न आणि पाणीही दिलं जात नाही. त्या तळ्यातून जंगलात पाणी आणतात आणि तिथं अन्न शिजवतात.
अगदीच आणीबाणीच्या परिस्थितीत हॉटेलमधून जेवण मागवलं जातं. जर अशा महिलेनं गावातील कशाला स्पर्श केला, तर ते अशुभ मानलं जातं.
अधिकाऱ्यांचे प्रयत्न
या प्रथेमुळं संबंधित गावांतील महिलांना धोकादायक स्थितीमध्ये राहावं लागत असल्याचं अधिकारीही मान्य करतात. त्यामुळं ते जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जोपर्यंत लोकांमध्ये बदल होत नाही, तोपर्यंत अशा प्रथा बदलणं कठिण असल्याचं मत, कुप्पममधील महसूल विभागाचे अधिकारी शिवैय्या यांनी बीबीसीबरोबर बोलताना व्यक्त केलं.
"काही लोक पूर्वजांच्या परंपरेच्या नावावर महिलांना घराबाहेर ठेवतात. त्याचा परिणाम म्हणजे या महिलांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यांना साप, विंचू आणि इतर प्राणी कीटकांमध्ये राहावं लागत असल्यानं ते धोकादायक आहे. त्यामुळं आम्ही ही प्रथा असलेल्या प्रत्येक गावात जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करत आहोत. अशा महिलांना घराबाहेर न ठेवता घरातच ठेवावे हे समजावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पण कितीही जनजागृती केली तरीही, गावातील रहिवाशांमध्ये बदलाची सुरुवात होणं गरजेचं आहे. तरुणांमध्ये आता काही बदल दिसत आहेत," असंही ते म्हणाले.

अशा काळात म्हणजे मासिक पाळीदरम्यान महिलांना काळजी घेण्याची आणि पोषक अन्नाची अधिक गरज असते. त्यामुळं त्यांना घरातच राहू द्यावं, त्यात काहीही वाईट किंवा चुकीचं नाही हे समजावण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं, शिवैय्या म्हणाले.
"आम्ही गावांमध्ये लोकांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचा विचार करत आहोत. पण आम्ही किती प्रमाणात प्रयत्न करू शकतो. जेव्हा गावातील लोक यात काहीही वाईट नाही, असा विचार करू लागतील, तेव्हाच बदल घडू शकतो. ही प्रथा केवळ या गावांमध्येच प्रचलित आहे. मासिक पाळीच्या काळात कमजोरी येत असल्यानं महिलांना पोषक अन्नाची गरज असते. त्यामुळं त्यांनी घरातच राहणं गरजेचं आहे. त्यात काही धोका किंवा वाईट नाही. त्या महिलाही इतरांप्रमाणेच आहेत, त्यामुळं त्यांना घरातच राहू द्यावं, हे आम्ही सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत," असं ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























