'या' गावात दलितांना आजही प्रवेश नाही...

फोटो स्रोत, BBC/TULASI PRASAD REDDY
- Author, तुलसी प्रसाद रेड्डी
- Role, बीबीसीसाठी
- Published
तिरुपतीपासून 50 किलोमीटर अंतरावर एक गाव वसलंय. पकाला जिल्ह्यातील उप्परा पल्ली पंचायतीमधील 'वेमन इंदलू' असं या गावाचं नाव.
आजही या गावात दलितांना प्रवेश दिला जात नाही. एवढंच नाही तर या गावात चप्पल घालून प्रवेश करायला देखील परवानगी नाही.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जरी गावात येणार असतील तर त्यांना गावाबाहेर चपला काढून या, असं सांगितलं जातं.
21 व्या शतकातही अशी गावं अस्तित्वात आहेत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.
आमच्या वाडवडीलांपासून चालत आलेल्या 'प्रथा परंपरांचा' आम्हाला आदर असल्याचं गावातील लोक सांगतात.
या गावात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. शिवाय गावकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत असले तरी ते चप्पल घालत नाहीत.
गावकरी स्वतः पालवेकरी आणि दोरावार जातीचे असल्याचं सांगतात. या जाती मागास प्रवर्गात येतात. या गावातील सर्वजण एकाच कुळातील आहेत. मात्र त्यांच्या जाती वेगवेगळ्या आहेत.
वेंकटेश्वर स्वामी हे वेमना इंदलूचे ग्रामदैवत आहे. गावात लक्ष्मी नरसिंह स्वामी आणि गंगाम्मा यांचीही पूजा केली जाते.
भगवान व्यंकटेश्वराच्या श्रद्धेपोटी चपला घालणं बंद केल्याचं ग्रामस्थ सांगतात.
गावात जो कोणी येईल त्याला गावाबाहेर चप्पल काढावी लागते. तरच गावात प्रवेश दिला जातो.
वेमना इंदलू गावात राहणारे इरब्बा बीबीसीशी बोलताना सांगतात की, शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते कॉलेजपर्यंत सर्वचजण इथे अनवाणी फिरतात.
ते पुढे सांगतात की, "माझ्या मुलाने पदवीपर्यंत शिक्षण घेतलंय. त्याच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी त्याला चप्पल घालायला सांगितली होती. त्यानंतर माझ्या मुलाला बंगलोरमध्ये नोकरी मिळाली. पण तरीही त्याने चप्पल घातली नाही. आम्ही पालवेकरी जातीचे कुलीन लोक आहोत. आम्ही वेंकटेश्वर स्वामी, नरसिंहस्वामी, गंगाम्मा यांची पूजा करतो. शाळा कॉलेजात गेल्यावर पुन्हा येताना आंघोळ करून घरी यावं लागतं. ही प्रथा आमचा वंश सुरू झाल्यापासून अस्तित्वात आहे."

फोटो स्रोत, BBC/TULASI PRASAD REDDY
बाहेरील लोकांना स्पर्श करण्याची परवानगी नाही
शिवाय गावकऱ्यांना बाहेरच्या लोकांनी स्पर्श करू नये अशी प्रथा आहे. गावकरी बाहेर गेल्यावर त्यांना दुसऱ्या ठिकाणी राहावं लागलं तरी ते बाहेरच्या अन्नाला स्पर्श देखील करत नाहीत.
इरब्बा सांगतात की, आम्ही गावाबाहेर पाऊल टाकलं तर इतरत्र कुठेही खात नाही. किंबहुना पाणी सुद्धा पित नाही.
इरब्बा पुढे सांगतात, "तुम्ही मला हात लावला तर मी अंघोळ करून, कपडे बदलून घरी जाईन. न्यायालयाच्या कामानिमित्त हैदराबादला जाणं येणं होत. पण मी तिथे काही खात नाही, घरी येऊन अंघोळ करून मगच जेवतो. जाताना पाणी घेऊन जातो."
व्यंकटेश्वर स्वामी हे ग्रामदैवत आहे. मात्र जवळच असलेल्या तिरुमला श्रीवरी मंदिरातही गावकरी जात नाहीत.

फोटो स्रोत, BBC/TULASI PRASAD REDDY
आजारी पडल्यावर डॉक्टर ऐवजी मंदिरात जातात
गावकरी आजारी असतील तर ग्रामदैवत असलेल्या व्यंकटेश्वराच्या मंदिरात पूजा करतात पण दवाखान्यात जात नाहीत.
गावकऱ्यांचा विश्वास आहे की, लोकांना काही झालं तरी व्यंकटेश्वरा स्वामी त्यांच्या मदतीला धावून येतील, त्यांना आजारातून बरं करतील. या गावात कोणीही कोविडची लस घेतलेली नाही.
इरब्बा सांगतात, "एखाद्याला जर साप चावला तर दवाखान्यात जाण्याऐवजी मंदिराला प्रदक्षिणा घालून तो व्यक्ती बरा होतो. देव त्याचं रक्षण करतो."
इरब्बांचे कुटुंबीय व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दररोज पूजाअर्चा करतात. या गावात केवळ एकच कुटुंब राहायला आलं होतं. या एका कुटुंबापासून वाढलेली वंशवेल आज 25 कुटुंबांवर स्थिरावली आहे.
80 लोकसंख्या असलेल्या या गावात 52 मतदान आहेत. यातले पदवीचं शिक्षण घेतलेले एक दोघेजणच आहेत.
बाकी सर्वजण अशिक्षित आहेत. ज्यांनी शिक्षण घेतलंय ते नोकरीसाठी बाहेर पडण्याऐवजी शेती करतात.
या गावातील प्रथा परंपरा लहान मुलांसाठीही आहेत. या गावातील लहान मुलं चप्पल घालत नाहीत. शाळेत दिलेला भात खात नाहीत. बाहेरच्या माणसांना स्पर्श केला तरी आंघोळ करूनच घरात प्रवेश करतात.
आजूबाजूच्या गावातील लोक आले तरी त्यांना गावाच्या वेशीबाहेर आपल्या चपला काढाव्या लागतात. हे लोक गावात जरी आले तरी त्यांना गावकरी आपल्या घरात बोलवत नाहीत.

फोटो स्रोत, BBC/TULASI PRASAD REDDY
'दलितांना गावात प्रवेश नाही'
वेमन इंदलू गावाच्या शेजारी मल्लेला चेरुवुपल्ले नावाचं गाव आहे. या गावातील भाविता बीबीसीशी बोलताना सांगतात, "एखाद्या कामानिमित्त आम्ही वेमन इंदलूमध्ये गेलो तर आम्हाला कोणी पाणीही देत नाही."
"आपण या गावात साध्या बहाण्यानेही जाऊ शकत नाही. तुम्ही कामानिमित्त गावात गेलात तरी घराबाहेर उभं राहून त्यांच्याशी बोलावं लागतं. तुम्ही त्यांच्या घरातही जाऊ शकत नाही. माझ्या मते, तिथे महिला गरोदर राहिल्या तरी दवाखान्यात जात नाहीत."
या गावात दलितांना प्रवेश दिला जात नाही. त्यांच्याशी कोणीही बोलत नाही. मासिक पाळीच्या काळात महिलांना गावाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे.
आपल्या गावाची चर्चा माध्यमांमध्ये होऊ नये असं गावकऱ्यांना वाटतं. वेमन इंदलूला शेजारच्या गावातून रेशन पुरवणारे बाबू रेड्डी बीबीसीशी बोलताना सांगतात की, त्यांना स्वतंत्रपणे रेशन दिलं जातं.
रेड्डी पुढे सांगतात की, "मी गेल्या चार वर्षांपासून रेशन डीलर म्हणून काम करतोय. मागास प्रवर्गातील लोक या गावात जाऊ शकतात मात्र अनुसूचित जाती जमातींना इथे प्रवेश नाहीये. वेमन इंदलूचे लोक आमच्या गावात, घरात येत नाहीत. त्या गावातील महिलांना मासिक पाळी आली की गावाबाहेर राहावं लागतं, त्यासाठी गावाबाहेर एक खोली बांधण्यात आली आहे."

फोटो स्रोत, BBC/TULASI PRASAD REDDY
शंभर वर्ष मागे पडलेलं गाव
जनविज्ञान वेदिका या संस्थेचे जिल्हाध्यक्ष ए. आर. रेड्डी सांगतात की, हे गाव शंभर वर्ष मागे आहे.
ते सांगतात, "आम्ही लहान असताना अशा गोष्टी ऐकल्या होत्या. आज अस्पृश्यता हा गुन्हा आहे. पण परिस्थिती अजूनही तशीच आहे. सुशिक्षित लोक पुढे येऊन अशा घटनांची माहिती देत नाहीत."
रेड्डी पुढे म्हणतात, "काहीही सांगितलं की लोक मूर्ख बनतात. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हस्तक्षेप करून लोकांना जाणीव करून द्यायला हवी. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना वेगळं ठेवणं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. सरकारने या गावकऱ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवायला हवेत, तरच त्यांच्यात बदल घडतील."

फोटो स्रोत, BBC/TULASI PRASAD REDDY
गावाच्या मागासलेपणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं काय मत आहे?
महेश नामक व्यक्ती आपल्या मोठ्या बहिणीची विचारपूस करण्यासाठी दुसऱ्या गावातून वेमन इंदलूला आला होता. त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, बाहेरून आलेल्या नातेवाईकांनाही या प्रथा पाळाव्या लागतात.
महेश सांगतो, "मी माझी चप्पल काढून गावाबाहेरच्या काटेरी झुडपात ठेवली. नंतर मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आलो. या गावात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. आम्हालाही त्या पाळाव्या लागतात."
वेमना इंदलू गावात सुरू असलेल्या या प्रकारावर माहिती घेण्यासाठी बीबीसीने तिरुपतीचे जिल्हाधिकारी व्यंकट रमण रेड्डी यांच्याशी संपर्क केला.
यावेळी ते म्हणाले की, गावात जनजागृती करण्यासाठी शिबिरं लावून ग्रामस्थांमध्ये बदल घडवून आणले जातील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























